
माढा तालुक्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री दोन ठिकाणी कुऱ्हाडीने मारहाण करत 60 हजार रुपयाचे सोन्याचे दागीने तीन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. शनिवारी रात्री ही घटना घडली असून चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी कुर्डुवाडी रोडवरील जिल्हा दूध संकलन केंद्रासमोरील नागनाथ काशीनाथ कुटे यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उचकटून अज्ञात तीन चोरटे घरात शिरले. कुटे यांच्या घरातील कुऱ्हाड घेत चोरट्यांनी कुटे यांच्या पत्नीच्या गळ्यातील दागिने हिसकावले. त्यामुळे त्या जागा झाल्या आणि आरडाओरडा केला.
या आवाजाने नागनाथ जागे झाले. त्यांनी चोरट्यांना विरोध केला. त्यामुळे चोरट्यांनी कुऱ्हाडीने आणि लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. या मारहाणीत नागनाथ कुटे यांच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यानंतर चोरटे दागिने घेत पसार झाले. ही घटना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. नागनाथ यांचा मुलगा व सुन हे आरडाओरडीने जागे झाले होते. मात्र, चोरट्यांनी त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी लावल्याने ते बाहेर येऊ शकले नाही.
त्याच रात्री पहाटे चार वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी सोलापूर रोडवरील वेणेगावच्या हद्दीतील भारत पेट्रोल पंपाच्या पाठीमागील राजेंद्र पराडे यांचे घराचा दरवाजा उचकटून मंगल राजेंद्र पराडे यांचे गळ्यातील सुमारे 35 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. या दोन चोऱ्या या पहाटे दोन ते चार वाजण्याच्या सुमारास झाल्याची तक्रार सुवर्णा कुटे आणि मंगल राजेंद्र पराडे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीसांनी भेट दिली असून पुढील तपास सह पोलीस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत.
या चोरीचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली श्वानपथक व ठसे तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. स्थानीक गुन्हे शाखेची दोन पथके तपास कामी रवाना करुन लवकरात लवकर या घटनेचा छडा लावला जाईल असे सुशील भोसले यांनी सांगितले.




























































