झटपट श्रीमंत होण्यासाठी ते घरफोडय़ा करायचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

सामना प्रतिनिधी ,वसई

दि. 5 (सा.वा.) – श्रीमंत होण्यासाठी मेहनत न करता काहीजण गुन्हेगारीचा मार्ग अवलंबतात. वसईतील सख्ख्या भावंडांनीदेखील झटपट श्रीमंत होण्यासाठी आपल्या साथीदारांसोबत थोडय़ाथोडक्या नव्हे तर दहा घरफोडय़ा केल्याचे उघडकीस आले आहे. त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील एकजण अल्पवयीन आहे. या टोळक्याने काही दिवसांपूर्वी वसईच्या बँक ऑफ महाराष्ट्र तर माणिकपूरमधील बँक ऑफ बडोदावरदेखील दरोडा घालण्याचा प्रयत्न केला होता.

संदीप बटवाडे (22), बादल बटवाडे (19) व त्यांचा साथीदार शिवपूजन प्रजापती, अंकित ऊर्फ बंटी यादव अशी या भामटय़ांची नावे आहेत. या चौघांनी पारनाका येथील बँक ऑफ महाराष्ट्र व माणिकपूरच्या बँक ऑफ बडोद्याचे शटर, लॉक तोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.  मात्र सायरन वाजल्याने तो फसला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे पकडलेल्या आरोपींपैकी एकजण बारावी शिकलेला तर दुसरा इंजिनीअर आहे. त्यांच्याकडून सवा लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

कटरची ऑनलाइन खरेदी

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ गुन्हे तर माणिकपूर व वसई पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी श्रीमंत होण्याच्या नादात हा मार्ग अवलंबला असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे शटर व लॉक तोडण्यासाठी त्यांनी अलिबाबा डॉट कॉम या साईटवरून ऑनलाइन कटर खरेदी केले होते. या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश पोलिसांनी केल्याने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.