
पुणे शहरात वाहनचोरी, घरफोडी करणार्या चोरट्याला येरवडा पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. वनराज महेंद्र जाधव असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
वाडीया बंगला परिसरात बुधवारी रात्री 10.45 सुमारास एकजण हातामध्ये तलवार घेवून धिंगाणा घालत असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्या ताब्यातील दुचाकी चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. यानूसार त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पिंपरी चिंचवडमधील देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी एक दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्यानूसार पोलिसांनी आरोपीकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने कोंढवा भागात एका मेडीकलमध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, सहायक पोलीस फौजदार प्रदीप सुर्वे, अंमलदार संजय काळेल, गणपत थिकोळे, तुषार खराडे, वैâलास डुकरे, सुरज ओंबासे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

































































