मालामाल चोरट्यांचा तोरा लय भारी! दिल्लीतून विमानाने येऊन पुण्यात डल्ला

विमानाने पुण्यात येऊन चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३५ बंडल केबल, ट्रक असा २५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. शफिक अहमद (वय ४९), राजबुल (वय ३०), वारीस फकीर महंमद (वय ३५, तिघेही रा. दिल्ली), एम. डी. जीत (वय ४४, रा. बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कर्वे पुतळ्यानजीक ५ लाखांची केबल चोरीची घटना २२ जुलैला घडली होती. तांबे असलेली धातूची एक हजार फूट लांब केबल बीएसएनएल टेलिफोन कनेक्टसाठी वापरली जाणार होती. केबलची चोरी झाल्याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी कर्वे रोड परिसरात संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्यांना शिताफीने पकडले. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक सुनीता रोकडे, निरीक्षक अनिल माने, उपनिरीक्षक गणेश दीक्षित महेश, निंबाळकर, धीरज पवार, सोमेश्वर यादव आदींच्या पथकाने केली.

घरफोडीतील पैशातून कार खरेदी
पुणे, मुंबईसह विविध ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लांबवणाऱ्या चोरट्याने चोरीच्या पैशातून कार खरेदी करून ऐशोआराम माजवला. सिंहगड रोड पोलिसांनी त्याला सापळा रचून कारसकट ताब्यात घेतले. त्याच्याकडून १४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडून आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.
रेवण उर्फ रोहन बिरू सोनटक्के (वय २४, रा. दिघी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

सोनटक्केने सिंहगड रस्ता, उत्तमनगर, विमाननगर आणि भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्यांचे आठ गुन्हे केल्याचे तपासात स्पष्ट झाले. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्ह्याच्या ठिकाणावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी सोनटक्के याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याला भोसरीतून ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.