
सोनसाखळी चोरणाऱ्या दोन चोरटय़ांनी कोल्हार येथील एका महिलेचे सोन्याचे गंठण चोरले. मात्र, मायलेकींनी प्रतिकार केल्याने चोरटय़ांना पळून जाता आले नाही. मायलेकींच्या प्रतिकारात दुचाकी पोलला धडकून चोरटे जखमी झाल्याची घटना नगर-मनमाड महामार्गालगत घडली आहे.
काय घडलं नेमकं?
सोन्याच्या आमिषापोटी दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांना थेट रुग्णवाहिकेतून जावे लागल्याच्या या घटनेची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती. राहुल राजेश जाधव (रा. शिर्डी) असे जखमी चोरटय़ाचे नाव आहे, तर त्याचा साथीदार फरार आहे. चोरटय़ांसोबत प्रतिकार करताना छाया शांताराम जगधने आणि त्यांची मुलगी राणी या जखमी झाल्या आहेत.
छाया जगधने यांचे नगर-मनमाड रस्त्यालगत चहा व इतर स्टेशनरीचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी दोन चोरटे चहा घेऊन रेकी करून गेले. सायंकाळी परत त्याच दुकानात ते चहा घ्यायला थांबले. संधी साधून त्यांनी छाया लोखंडे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडून दुचाकीवरून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला.
छाया आणि त्यांची मुलगी राणी यांनी सोनसाखळी चोराला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटय़ांनी दुचाकी पुढे दामटल्याने मायलेकी फरफटत गेल्याने जखमी झाल्या. या झटापटीत चोरटय़ांची दुचाकी एका पोलवर धडकली. यात एकजण गंभीर जखमी झाला. दरम्यान, गर्दी झाल्याने एकाने गंठण घेऊन शेजारील शेतातून पळ काढला. मात्र, गंभीर जखमी झालेल्या त्याच्या साथीदाराला रुग्णवाहिकेमधून प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चेन स्नेचिंगच्या अनेक घटना यापूर्वी राज्यात घडल्या आहेत. मात्र, छाया लोखंडे-जगधने व राणी जगधने या मायलेकींनी दाखविलेल्या हिमतीमुळे चोरटा जेरबंद नव्हे, तर थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे. रात्री उशिरापर्यंत लोणी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी तपास करीत आहेत.

























































