कल्याणमध्ये चोरट्यांनी पानटपरी फोडली; सिगारेटची पाकीटे, लायटर्स, तंबाखू पळवली!

882

लॉकडाऊनमुळे दारू, सिगारेट तसेच तंबाखूचे व्यसन असणाऱ्यांची अडचण झाली आहे. मात्र, त्यावरही अनेकांनी विविध पर्याय शोधले आहेत. तर ‘कोरोना’ च्या नावानं चोरट्यांचं चांगलंच चांगभलं झाल्याचे दिसून येत आहे. कल्याणच्या खडकपाडा येथे काही चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पानटपरी फोडून त्यातील 40 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. त्यात सिगारेट ,तंबाखू ,लाइटरसह अन्य वस्तूंचाही समावेश आहे.

अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर 2वाजण्याच्या सुमारास खडकपाडा येथील ओम साई पान शॉपवर डल्ला मारला. एका चोरट्याने तोंडाला रुमाल लावला होता. त्याने सीसीटीव्ही कॅमेर्‍याची दिशा वळवली आणि शटर फोडले. दुसऱ्या तरुणाने पानटपरीमधील विविध ब्रँडची सिगारेटची पाकिटे लांबवली. एवढेच नव्हे तर टपरीमधील गायछाप, सातारी जर्दा, ओम पुडी ,खैनी या ब्रँडच्या तंबाखूची पाकिटे देखील चोरट्यांनी पळवली. चोरट्यांनी केवळ तंबाखू तसेच सिगारेटची पाकीटेच नव्हे तर लायटरचे बॉक्स, सेंटच्या बाटल्या असा एकूण 40 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. पानटपरीचे मालक अजय चौरसीया यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, व्यसनाधीन चोरट्यांना लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या