कोल्हापूरात चोरट्यांचा कांदा,बटाट्याच्या साठ्यावर डल्ला; मार्केट यार्डातील दुकान फोडले

कोल्हापुरातील मार्केट यार्डातील दुकान फोडून चोरट्यांनी कांदा,लसून, बटाटा व आले असा सुमारे 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रकाश उत्तमचंद उंबराणी ( वय 57, रा.ताराबाई पार्क) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश उंबराणी यांचा मार्केट यार्डात कांदा, बटाटा, लसूण व आले विक्रीचा व्यवसाय आहे. रात्री चोरट्यांनी त्यांच्या बंद दुकानाचा पत्रा उचकटून आतील 5 पोती लसून, 7 पोती बटाटा, 9 पोती कांदा व एक पोते आले असा सुमारे 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला.

गेल्या काही दिवसांपासून बाजारात कांदा, बटाटा, लसून,आले सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अजूनही त्यांचे चढे दर आहेत. बाजार समितीत सीसीटीव्ही तसेच सुरक्षारक्षक असतानाही चोरट्यांनी रात्रीत दुकान फोडून चोरी केली कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच दोन्ही बाजूला असलेल्या तपासणी नाक्यातही चोरटे कसे सापडले नाहीत, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या