चोरलेले ‘ते’ एटीएम वावीजवळ सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

 सामना ऑनलाईन । नाशिक

नगर जिह्यातील संगमनेर येथून चोरटय़ांनी शनिवारी पहाटे एटीएम मशीनच पळविले. सिन्नर तालुक्यातील वावीजवळील माळवाडी शिवारात येऊन हे मशीन फोडून रकमेसह चोरटे पसार झाले. या ठिकाणी जळालेल्या नोटा आणि ऑक्सिजन सिलिंडरही आढळले आहे.

संगमनेर येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीनच चोरटय़ांनी शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पळविल्याने खळबळ उडाली. त्यात सुमारे 17 लाख रुपये होते. सिन्नर तालुक्यातील माळवाडी गावाजवळ एका टेकडीच्या मागे सकाळी सात वाजता ग्रामस्थांना गॅस कटरने कापून फेकलेले एटीएमचे तुकडे दिसून आले. त्यांनी वावी पोलिसांना ही माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांनी पथकासह घटनास्थळी धाव   घेतली. हे एटीएमचे तुकडे संगमनेरमधून पळविलेल्या मशीनचेच असल्याचे उघडकीस आले आहे. एका मोठय़ा वाहनातून चोरटय़ांनी हे मशीन या टेकडीमागे आणले असावे, तेथे गॅस कटरच्या सहाय्याने साडेतीनशे किलो वजनाच्या या मशीनचे तुकडे केले. या ठिकाणी काही जळालेल्या नोटा, ऑक्सिजनचे रिकामे सिलिंडर, तिजोरीचे तुकडेही आढळून आले आहेत. पुढील तपास संगमनेर पोलीस करीत आहेत.