भाजपविरोधातील तिसरी आघाडी अपयशी ठरेल, आठवलेंचे सुतोवाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

रिपाइंचे शहर अध्यक्ष संतोष पवार यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले पंढरपूरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवले यांनी भाजपविरोधातील तिसऱ्या आघाडीवर वक्तव्य केले. ‘कर्नाटक राज्यातील निवडणुकीनंतर कुमारस्वामी यांच्या शपथविधीला देशातील भाजप विरोधी सर्व पक्षाचे प्रमुख एकत्र आले. त्यानंतर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजप विरोधी पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करून लढण्याची चर्चा सुरू झाली, मात्र ही तिसरी आघाडी अपयशी ठरेल, कारण त्या-त्या राज्यात स्थानिक पक्षांमध्ये मतभेद आहेत. ते कदापी एकत्र येऊ शकणार नाहीत’, असे सूतोवाच आठवले यांनी केले.

रामदास आठवले म्हणाले, तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्षशरद पवार यांच्याकडे दिले आहे, मात्र यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मागे पडतील. शिवाय अनेक राज्यातील स्थानिक पक्षांमध्ये मतभेत आहेत. त्यामुळे भाजप विरोधातील तिसरी आघाडी अपयशी ठरेल. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना यांची जुनी मैत्री आहे. त्यामुळे त्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढवाव्यात. युतीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याविषयी त्यांना सांगितले आहे. सत्तेतील हे दोन पक्ष विभक्त झाल्यास राज्याचे ही मोठे नुकसान होणार आहे.

भिडे गुरुंजीवर कारवाई व्हावी…

नंदूरबार येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे गुरुजी यांनी संविधानाविरोधात वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.