अकरावीच्या तिसऱ्या यादीसाठी चुरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अकरावीच्या अल्पसंख्याक, इनहाऊस आणि मॅनेजमेंट कोटय़ाच्या मिळून तब्बल १ लाख ८३ हजार ७४१ जागा रिक्त आहेत. न्यायालयाने कोटय़ातील प्रवेशाला स्थगिती दिल्याने ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, दुसऱ्या गुणवत्ता यादी वेळी झालेल्या गोंधळामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांनी अलॉट झालेल्या कॉलेजात प्रवेशच न घेतल्यामुळे २६ जुलैला जाहीर होणाऱ्या तिसऱ्या यादीसाठी मोठी चुरस रंगणार आहे. या यादीतील प्रवेशासाठी कॉलेज पसंतीक्रम बदलण्यासाठी उद्या मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शेवटची संधी आहे.

– ऑनलाइन दोन्ही याद्या मिळून आतापर्यंत ८८ हजार ४३१ प्रवेश झाले आहेत.
– अकरावीसाठी तब्बल २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
– प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आतापर्यंत ४६ टक्के प्रवेशच झाले आहेत.
– ऑनलाइनमध्ये १ लाख ९० हजार ५२९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यापैकी ८८ हजार ४३१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे.
– विविध कारणांमुळे ३१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले तर अर्ज भरताना झालेल्या चुकांमुळे ३९९ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले.

कॉलेज पसंतीक्रम बदलण्याचा शेवटचा दिवस

तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी या विद्यार्थ्यांना दोन्ही याद्यांत प्रवेश मिळाले नाहीत अशा विद्यार्थ्यांना कॉलेज पसंतीक्रम बदलण्याची उद्या शेवटची संधी आहे. कॉलेजमधील रिक्त जागा पाहून विद्यार्थ्यांनी तिसऱ्या यादीसाठी अर्ज भरावयाचा असून तिसरी यादी २६ जुलैला सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ आणि २८ जुलै या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे.