दादा जग सोडून गेले, तरी आपल्या हृदयातून कधी जाणार नाही, भास्कर जाधव यांनी अजित दादांना वाहिली श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित दादा म्हणजे महाराष्ट्राचा आधारवड. पक्ष, जात, धर्म, पंथ न पाहता मदत करणारा नेता होता अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. तसेच तो जग सोडून गेला असला, तरी आपल्या हृदयातून कधी जाणार नाही असेही भास्कर जाधव म्हणाले.

विधीमंडळात बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, या सभागृहाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहासमोर जो शोकप्रस्ताव मांडलेला आहे, त्या प्रस्तावावर मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक भावना व्यक्त करण्यासाठी उभा आहे.

वर्षामध्ये तीन अधिवेशने होतात आणि किमान 25 ते 30 जणांना आपण श्रद्धांजली अर्पण करत असतो. आपण चेअरवरून शोकप्रस्ताव मांडता आणि आपण सर्वजण त्या प्रस्तावामध्ये सहभागी होत असतो. परंतु आजचा शोकप्रस्ताव हा त्या सर्व प्रस्तावांपेक्षा वेगळा आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, कैलासवासी अजित दादांबद्दल त्यांच्या आयुष्याचे सर्व पैलू, त्यांची जडणघडण, स्वभाव आणि स्वभाववैशिष्ट्ये सभागृहासमोर मांडली आहेत.

अजित दादांबरोबर मीही अनेक वर्षे काम केले आहे. 1995 साली आम्ही सभागृहात आलो, तेव्हा आम्ही सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणून एका बाजूला बसत होतो आणि विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अजित दादा समोरच्या बाजूला बसत असत. 1995 ते 1999 या काळात मी त्यांना सभागृहात फारसे बोलताना कधी ऐकले नाही. अतिशय मितभाषी, उमदे, देखणे, सडपातळ अंगकाठीचे—पांढरी पॅन्ट, पांढरा फुलहातांचा शर्ट—असे ते व्यक्तिमत्त्व. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित पाहण्यासाठी आमच्यासारखे विरोधी बाकावर बसलेले सदस्यसुद्धा त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असत.

खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला अजित दादा अनुभवायला मिळाले ते 1999 नंतर, जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले आणि ते मंत्री झाले. त्यांच्या नसानसांत ग्रामीण भागाबद्दलची कणव आणि कळवळा होता. ते केवळ बोलण्यातून नव्हे तर कृतीतून दिसत होतं. त्यांच्यावर अनेक आरोप झाले, पण त्यांनी कधी व्यथित होऊन त्यावर भाष्य केलं नाही. आरोपांकडे दुर्लक्ष करून ते कामात मग्न राहत.

प्रश्नोत्तराचा तास असो, कोणताही प्रश्न असो—अजित दादांनी तो स्वीकारायचे आणि सडेतोड उत्तर द्यायचं. काम होण्यासारखं असेल तर “होईल” स्पष्ट सांगायचे; शक्य नसेल तर “होणार नाही” असं ठाम सांगायचे. एवढं ठोस उत्तर देणारा नेता आज क्वचितच दिसतो.

त्यांच्याकडे नैतिक बळ होतं. एखादं काम होऊ शकत असूनही, ते केल्यामुळे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल तर ते स्पष्टपणे नकार द्यायचे. “हे काम होऊ शकलं असतं, पण केल्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना त्रास होईल, म्हणून मी करणार नाही,” असं सांगण्याचं धाडस त्यांच्यात होतं.

2004 मध्ये मी शिवसेना सोडली आणि 2005 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2005 ते 2019 या काळात मी त्यांच्यासोबत काम केलं. काही काळ राज्यमंत्री, तर पक्षाचा राज्याध्यक्ष म्हणूनही काम केलं. लोकांना वाटायचं की दादांना खुश करण्यासाठी बोललं की जवळीक वाढते. पण मी अनुभवलं की खरं बोलण्याचं धाडस दाखवलं तर ते स्वीकारण्याचा मोठेपणा त्यांच्यात होता. वयाने ते माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान; पण अध्यक्ष म्हणून त्यांनी माझा मान राखला. “मी मोठ्या घराण्यातला नेता आहे, उपमुख्यमंत्री आहे” असा भाव त्यांच्या वागण्यात कधी नव्हता.

वरून ते काटेरी फणसासारखे भासत; पण आतून अत्यंत रसाळ, मधाळ, गोड. गेलेल्या माणसाबद्दल चांगलंच बोलायचं असतं, पण दादा खरोखरच चांगले होते म्हणून आपण चांगलं बोलतोय.

दादांच्या निधनाच्या दिवशी सकाळी मी टीव्ही पाहत नव्हतो. माझा मुलगा विक्रांत धावत आला—“पप्पा, टीव्ही लावा.” विमानाचा अपघात झाल्याची बातमी होती. काही वेळातच सर्व सहा जणांच्या मृत्यूची शक्यता सांगितली गेली. मी ताबडतोब बारामतीला गेलो. पवार कुटुंबीयांना भेटलो.

मुख्यमंत्री महोदय, चौकशी सीबीआयमार्फत करा, सीआयडीमार्फत करा, डीजीसीएमार्फत करा—पण महाराष्ट्राच्या मनात संशय आहे. हा केवळ अपघात होता का घातपात, हे शोधून काढणं आवश्यक आहे. पवार साहेबांनी त्या दिवशी “हा अपघात आहे” असं सांगितलं; त्यामागे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा मोठा हेतू होता. बारामतीत ठिणगी पडली असती, तर संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघाला असता.

दादा म्हणजे महाराष्ट्राचा आधारवड. पक्ष, जात, धर्म, पंथ न पाहता मदत करणारा नेता. आज तो आधारवड कोसळला आहे. ब्रह्मकमळ रात्री उमलतं; पण अजित दादा नावाचं ब्रह्मकमळ महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यान्ही उमललं आणि तेजाने तळपत होतं. कुणाची नजर लागली माहीत नाही, पण ते अकाली कोमेजलं.

या सभागृहाने विलासराव देशमुख, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, आर.आर. पाटील अशा नेत्यांना श्रद्धांजली वाहिली आहे; पण दादांचा शोकप्रस्ताव माझ्या दृष्टीने वेगळा आहे.

एक वैयक्तिक प्रसंग सांगतो. 2006 मध्ये विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. दादांनी मला मदतीसाठी 25 लाख रुपये दिले—मी आयुष्यात प्रथमच इतकी रक्कम एकत्र पाहिली. नंतर जेव्हा त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी त्यात भर टाकून मला सन्मानाने पाठवलं. असा उदार नेता आज आपल्यात नाही.

शेवटी एवढंच म्हणेन—

स्पष्टता व सत्याचा आधार निघून गेला,
स्नेह, प्रेम आणि आपुलकीचा मिनार कोसळून गेला.
तो जग सोडून गेला असला, तरी आपल्या हृदयातून कधी जाणार नाही.

मी माझ्या कुटुंबातर्फे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या वयोवृद्ध मातोश्रींना, पवार साहेबांना, सुनेत्रा वहिनींना, जय आणि पार्थ यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही आई जगदंबेकडे प्रार्थना करतो.