मुरबाडच्या फांगुळगव्हाण नदीत विष कालवले; मृत माशांचा खच, गावकरी, वन्यप्राण्यांचे पाण्यावाचून हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माळशेज घाट परिसरातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या नदीमध्ये अज्ञात व्यक्तींनी विषारी औषध टाकल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. या पाण्यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडले असून आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या गावकरी व वन्यप्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. दरम्यान नदीच्या पाण्यात विष कुणी कालवले याचा शोध घेण्यात येत असून पाण्याचे नमुने तपासले जाणार आहेत.

फांगुळगव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील साखरवाडीला याच नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी नदीच्या पाण्यात विष टाकल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. फांगुळगव्हाण हे गाव मुरबाड तालुक्यातील शेवटचे गाव ओळखले जाते. नदीमध्ये विष कालवल्याचे समजताच ग्रामसेवक बाळू कोकणे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाड्यावस्त्यांवर तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

दोषींना अटक करा

ग्रामसेवकाने नदीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी शहापूर येथे पाठवले आहेत. त्याचा अहवाल येईपर्यंत ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान सरपंच सविता भला यांनीदेखील दोषींना अटक करावी अशी मागणी केली आहे.

उन्हाचे चटके आणि तहान

आतापासूनच उन्हाचे चटके सुरू झाले असून मुरबाडच्या जंगलातील झरे, ओहोळ, नाले, बंधारे व नद्यांमधील पाण्यावर पशुपक्षी, जनावरे आपली तहान भागवण्यासाठी येत आहेत. अशा परिस्थितीत पाण्यात विष टाकले जात असेल तर हे मानवतेला काळिमा फासण्याचे कृत्य असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.