
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक मुंबईत धडकल्याने रेल्वे स्थानक, पालिका परिसरात अक्षरशः मराठ्यांची छावणीच पडली आहे. आझाद मैदानात आंदोलकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे परिसरातील रस्ते आणि रेल्वे स्थानकांवर शेकडोच्या संख्येने मराठा आंदोलकांनी ठाण मांडले आहे. एक मराठा लाख मराठा… जय भवानी जय शिवाजी… पाटील-पाटील एकच पाटील… मनोज जरांगे-पाटील… अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदान दुमदुमून गेले होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस होता.
मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी हजारो आंदोलक आल्यामुळे संपूर्ण फोर्ट परिसरात गर्दी झाली आहे. आझाद मैदानात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे परिसरात आंदोलकांचे जथेच्या जथे परिसरात उपलब्ध जागेमध्ये घोषणाबाजी करीत आहेत. हीच स्थिती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटांवर दिसत आहे. शेकडो आंदोलक याच ठिकाणी ठाण मांडून आहेत.
टेम्पो भरून झुणका-भाकर
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या बाहेर टेम्पो आणि ट्रकच्या रांगा लागलेल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली आहेत. दुपारच्या नंतर एका टेम्पोतून झुणका-भाकर आणल्या. भाकऱ्यांचा ढीग होता. आंदोलकांना झुणका-भाकरीचे वाटप सुरू होते.
टेम्पोतच जेवण शिजवले, बीडच्या घाटनांदूरमधून मराठा आंदोलकांचा एक जथा
27 तारखेला टेम्पो घेऊन मुंबईत दाखल झाला आहे. विशाल देशमुख, राजकमल देशमुख, गणेश देशमुख, वसंत कदम, बाळासाहेब देशमुख, जीवन जाधव या तरुणांनी टेम्पो डोंगरीला पार्क केला आणि आझाद मैदानाकडे कूच केले. त्यांनी आंदोलनासाठी खास टी शर्ट तयार करून घेतली आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेऊन हे तरुण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर विसावले. सोबत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि भूक लागली तर सोबत शेव-चिवडा होता. यांच्यापैकी काही जणांनी प्लॅटफॉर्मवरच पथारी पसरली. आम्ही दिवसभर आझाद मैदान, सीएसटीएम परिसरात थांबतो आणि मग डोंगरीला टेम्पोकडे जातो. एक महिना पुरेल एवढे रेशन आम्ही सोबत आणले आहे. टेम्पोतच जेवण करतो. डोंगरीत पालिकेच्या टँकरखाली आंघोळ करतो. आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही, असा निर्धार विशाल देशमुख यांनी व्यक्त केला.
महिला आंदोलकांचाही सहभाग
सीएसएमटीवर मराठा समाजातील महिलाही आंदोलनात हिरीरीने सहभागी झाल्या आहेत. संघर्ष योद्धा असा बॅनर घेतलेल्या महिला आंदोलक जोरदार घोषणा देत होत्या. एक मराठा लाख मराठा… आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, अशा घोषणा देत होत्या.
तरुणाला आली चक्कर
सीएसएमटीमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास पाटील नावाच्या एक तरुणाला चक्कर आली आणि प्लॅटफॉर्मवरच पडला. या तरुणाच्या तोंडावर तातडीने पाणी मारले. काही मिनिटांतच हा तरुण भानावर आला.
कारंजामध्येच अंघोळ
मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉइंटजवळ पालिकेने कारंजा तयार केला आहे. आंदोलकांना अंघोळीसाठी पाणी मिळाले नाही. त्यामुळे आंदोलक थेट कारंजामध्येच उतरले आणि कारंजातील पाण्याने अंघोळ केली. याच परिसरात तळ ठोकलेल्या एका तरुणाने मी जरांगे असे अंगावर रंगवले होते.
केळी आणि लाडू-चिवडा
पावसामुळे अनेक आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवरच तळ ठोकला आहे. आंदोलकांच्या घोषणांनी संपूर्ण सीएसएमटी दुमदुमून गेले होते. स्टेशनमधील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील पाण्याच्या बाटल्या, लाडू, चिवडा, शेव, वेफर्सची पाकिटे घेण्यासाठी गर्दी उसळली होती.
संपूर्ण परिसराला भगव्या रंगाची किनार
चर्चगेटपासून गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, सीएसएमटी आणि दक्षिण मुंबईतील संपूर्ण रस्त्यावर भगव्या रंगाच्या टोप्या आणि खांद्यावर भगव्या रंगाची उपरणे घातलेले मराठा आंदोलकच दिसत होते. जय भवानी जय शिवाजी… मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.