डॉक्टरकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

डॉक्टरकडे अडीच लाखांची खंडणी मागतिल्याप्रकरणी तिघांना चारकोप पोलिसांनी अटक केली. दीपक माने, संध्या मुथुस्वामी, अलका निळे अशी त्या तिघांची नावे असून त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे एमडी डॉक्टर असून त्याचा चारकोप येथे दवाखाना आहे. तेरा दिवसांपूर्वी संध्या ही डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेली होती. डॉक्टर तपासात असताना संध्याने एक व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. त्यानंतर तीन जण तक्रारदार यांच्या क्लिनिकमध्ये आले. व्हिडीओबाबत विचारणा करून तक्रारदारांना मारहाण केली. मारहाणीनंतर अडीच लाखांची खंडणी मागून दोन लाख रुपये खंडणी घेऊन ते निघून गेले. खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रारदार यांनी चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. चारकोप पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी दीपकला ताब्यात घेऊन शनिवारी अटक केली. त्याच्या अटकेनंतर आज संध्या आणि अलकाला चारकोप पोलिसांनी बेडया ठोकल्या. त्या दोघींना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्या दोघींना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या इतर साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.