सॅनिटायझर टाकून पत्रकाराला जिवंत जाळलं, तीन जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात झालेल्या पत्रकाराच्या हत्येचं गूढ उलगडलं असून त्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. बातमी देण्यावरून आणि त्यावरून झालेल्या पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून ही हत्या झाली आहे.

काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यात कलवारी नावाच्या गावात राकेश सिंह निर्भीक नावाचा पत्रकार राहत होता. 27 नोव्हेंबर रोजी रात्री त्याच्या घरातून अचानक धूर येऊ लागल्याने एकच खळबळ माजली.

या आगीत होरपळून राकेश सिंह आणि त्याचा मित्र पिंटू साहू यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडाचा तपास करून तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरम अली उर्फ अब्दुल कादिर, ललित मिश्रा आणि केशवानंद मिश्रा उर्फ रिंकू या तिघांना या प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

कशी केली हत्या

या तिन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. बातमी छापण्याचा वाद आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीवरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. या तिघांनीही राकेश याला मारण्याचं कारस्थान रचलं. या कारस्थानात त्यांनी सॅनिटायझरचा वापर करण्याची योजना आखली.

त्यानुसार ते तिघेही गप्पा मारण्याच्या निमित्ताने त्याच्या घरात गेले. त्यांनी राकेश आणि त्याच्या मित्राला दारू पाजली. दारू पिऊन शुद्ध हरपल्यानंतर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर ओतून आग लावून देण्यात आली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला.