
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
स्वातंत्र्यदिनाचा वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात साजरा होत असताना जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पती-पत्नीसह तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या बंदोबस्तावरील पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वातंत्र्यदिनाचा ७१ वा वर्धापन दिन साजरा होत असताना अचानक सकाळी ९ च्या सुमारास कन्नड तालुक्यातील औराळा येथील शेतकरी भगवान वारे यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तसेच दुसऱ्या घटनेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शासकीय ध्वजारोहण सुरू असताना बदनापूर तालुक्यातील कंडारी येथील सरपंच सुरेखा दाभाडे आणि त्यांचे पती मुकुंद दाभाडे या दोघा पती-पत्नींनी आयुक्तालयातील कार्यक्रमस्थळी घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने वेळीच आत्महत्या करणाऱ्यांना ताब्यात घेतले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. या प्रकरणी सिटीचौक पोलिसांनी नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण आरोग्य तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, स्वातंत्र्यसैनिक, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

































































