
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात वीज कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे म्हैस मालकाचे नुकसान झाले आहे.
मौजे माळेगाव(कल्याणी) येथील किशोर ढवीले हे तीन म्हशींचा सांभाळ करत दुग्धव्यवसाय करुन घराचा प्रपंच भागवत होते. स्वतःची शेती नसल्याने जमेल तेथे चरण बघून म्हशी चारत फिरायचे. म्हशी चारता चारता दुपारी एक दरम्यान पाऊस सुरु होण्याचा अंदाज आल्यानंतर त्यांना एका झाडाखाली बांधून ते स्वतः आसरा पाहून थांबले. तेव्हा वीज कडकडाट वादळवारा सुरु होऊन जोरदार पाऊस होऊ लागला. अचानक वीज कोसळून त्यांच्या तीन्ही म्हशी बुधवारी दुपारी दगावल्या. या तीन म्हशी दगावल्याने किशोर ढवीले यांचे साधारण एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान होऊन त्यांच्या घरसंसाराचा आधारच तुटला आहे. या कष्टकऱ्याचे उत्पन्नाचे साधनच बुडाले आहे.





























































