लोकसभेचा पहिला टप्पा तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. नागपूर येथून एका अपक्ष आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून एक अपक्ष व भारिप बहुजन आघाडीचा एक उमेदवार, अशा तीन उमेदवारांनी सोमवारी पहिल्याच दिवशी अर्ज दाखल केले.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशीम अशा 7 मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. या सात मतदारसंघांत 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या सात जागांसाठी अर्ज भरण्याची अधिसूचना सोमवारी जारी होताच नागपूर आणि यवतमाळ-वाशीम येथून तीन उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25 मार्चपर्यंत असून 28 मार्च रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर दुसऱ्याटप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची अधिसूचना 19 मार्च रोजी जारी होणार आहे.

नागपूर मतदासंघातून अब्दुल करीम अब्दुल गफार पटेल. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून अपक्ष सुनील नायर आणि भारिप बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.