जामखेडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; वीज पडून तीन जनावरे दगावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

तालुक्यात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसात हाळगाव व आगी येथे चारा छावणीमध्ये वीज पडून तीन जनावरे दगावली. तर परिसरातील अनेक घरावरील पत्रे उडाले. काही घरांच्या भिंती पडल्या तर काही ठिकाणी फळबागाचेही नुकसान झाले आहे. जामखेड तालुक्यात मंगळवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक जोराचा वारा सुटल्याने छावण्यांतील जनावरांसह शेतकऱ्यांचे चांगलेच हाल झाले. वाऱ्यामुळे परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडाले तर हाळगाव येथील छावणीत वीज पडून दोन बैल मृत्यूमुखी पडले तर आघी येथे हनुमंत तेरकर यांची एक गाय अशी तीन जनावरे वीज पडून दगावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या भागातील अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच अनेक वृक्षही उन्मळून पडले आहेत.

आघी येथे बोराटे वस्तीवर पाच ते सहा घरांचे व नान्नज येथे सहा घरांचे पत्रे उडून गेले व काही घरांच्या भिंती पडल्या. त्यातच वीजेचे पोलही पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. बुधवारी सकाळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे तलाठी व ग्रामसेवक यांनी घटनेची पाहणी करून पंचनामे केले. ‘दैनिक सामना’शी बोलताना तहसीलदार नाईकवाडे म्हणाले की, वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या जनावरास तीस हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल व घरांच्या नुकसानीचे पंचनामे झाल्यावर पडझड झालेल्या व पत्रे उडालेल्या घरमालकांनाही काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल असे त्यांनी सांगितले. उष्णतेच्या लाटेमुळे होरपळून गेलेल्या जामखेड तालुक्यातील हळगांव, नान्नज, जवळा भागात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा लाभला. जामखेड तालुक्यात काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात मंगळवारी सरीवर सरी आल्या.