ब्रेकिंग : आणखी तीन आमदार काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ढासळती प्रकृती पाहता एनडीएतील घटक पक्षांना काँग्रेसच्या बाजूने वळवून सत्ता स्थापन करण्याचं काँग्रेसचं स्वप्न भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या रणनीतीमुळे भंगलं आहे. शहांच्या प्लॅनमुळे काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या गळाला लागले असून अजून तीन आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. काँग्रेसचे हे तीन आमदार भाजपमध्ये आल्यावर भाजपचे संख्याबळ 17 वर पोहोचेल आणि काँग्रेसला कोणत्याही स्थितीत सत्ता स्थापन करता येणार नाही.

गोव्याचा बदला महाराष्ट्र-राजस्थानात, भाजपचे दोन आमदार काँग्रेसमध्ये

2016 मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. 40 जागांच्या गोवा विधानसभेत काँग्रेसला सर्वाधिक 16 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला 12 जागा मिळाल्या होत्या. पण गोव्यातील प्रादेशिक पक्षांनी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असतील तर आम्ही भाजपला पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली. त्यानुसार तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रीकर गोव्यात परतले आणि त्यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आली होती.

विश्वजीत राणे पुढचे मुख्यमंत्री?
गेल्या वर्षभरात पर्रीकर यांची तब्येत प्रचंड खालावली असून भाजप त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे 2010 पासून गोवा विधानसभेत आमदार असलेले विश्वजीत राणे लवकरच मुख्यमंत्रिपदाची कमान सांभाळू शकतात. विश्वजीत राणे पक्षातील एक शक्तीशाली नेतृत्व असून एनडीएतील इतर घटक पक्षांनीही त्यांना पसंती दिली आहे.