परभणीतील तीन स्त्रीरोग तज्ज्ञांना ग्राहक मंचचा दणका; 70 हजाराचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

एका महिलेची शस्त्रक्रीया अर्धवट थांबवून तिला पुढील इलाजासाठी संभाजीनगरला पाठवून विनाकारण खर्चाचा भुर्दंड देणाऱ्या परभणीतील तीन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांना ग्राहक न्याय मंचने 70 हजाराचा दंड ठोठावला आहे. डॉ. श्रुती डुब्बेवार, डॉ. शिल्पा साबू आणि डॉ. रमेश आहुजा अशी या डॉक्टरांची नावे आहेत.

परभणी तालुक्यातील जांब येथील मंगला रेंगे यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना वसमत रोडवरील विठाई हॉस्पिटल येथे इलाजासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मंगला रेंगे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. ही शस्त्रक्रीया करण्याची प्रक्रियाही सुरु झाली. मात्र, मध्येच शस्त्रक्रिया थांबवून डॉक्टरांनी रेंगे यांना संभाजीनगरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यावेळी या डॉक्टरांनी महिलेला संभाजीनगरला इलाजासाठी येणारा खर्च देण्यास कबूल केले होते. त्यानुसार या महिलेवर संभाजीनगरच्या कमलनयन बजाज हॉस्पिटल येथे इलाज करण्यात आला. रेंगे यांनी डॉक्टरांकडे झालेला खर्च मागीतला. मात्र, डॉक्टरांनी आपला शब्द फिरवला. त्यांनी खर्च देण्यास साफ नकार दिला. त्यामुळे मंगला रेंगे यांनी या प्रकरणी परभणीच्या जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणात मंचने नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डिनने दिलेला अहवाल आणि इतर कागदपत्राची पडताळणी केली. तसेच अ‍ॅड. आर.बी. वांगीकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्यधरून निर्णय दिला.

डॉक्टरांनी रुग्णांविषयी बेजबाबदारपणा आणि निष्काळीपणा दाखविल्याची बाब न्यायमंचने विषद केली. तसेच या गुन्ह्याबाबत डॉ. श्रुती डुब्बेवार, डॉ. शिल्पा साबू आणि डॉ. रमेश आहुजा यांना 70 हजार रुपये दंड (रुग्णाला आलेला खर्च) व त्यावर 9 टक्के व्याज तसेच शारिरीक आणि मानसिक त्रासापोटी 6 हजार रुपये 30 दिवसांच्या आत देण्याचा निर्णय ग्राहक मंचच्या अध्यक्षा ए.जी. सातपुते आणि सदस्या किरण मंडोत यांनी सुनावला. या निर्णयामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करुन त्यांची आर्थिक लुबाडुक करणाऱ्या डॉक्टरांना चपराक बसली आहे.