
सामना प्रतिनिधी । नगर
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे काळू धरण परिसरातील शेततळ्यात पोहण्यास उतरलेल्या तीन मुलांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
ढवळपुरी येथील नूरमहम्मद बशीर शेख हे खाजगी पाण्याच्या टँकरवर चालक म्हणून काम करतात. काळू धरण परिसरातील खाजगी शेततळ्यावरून टँकर भरून परिसरातील जनावरांच्या छावण्यांना वितरित करण्याचे काम नूरमहम्मद बशीर शेख करत होते. गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान नूरमहम्मद, यांच्याबरोबर त्यांचा मुलगा नावेद, ईस्माईल शब्बीर शेख व मोईन निजाम शेख हे टँकर बरोबर गेले. तिथे टँकर भरत असताना हे तिघेही शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने व शेततळ्यात कोणताही आधार न मिळाल्याने हे तिघे बुडू लागले. ही घटना नूरमहम्मद यांच्या लक्षात आल्याने तिघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. त्यानंतर त्यांनी गावात फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावातून ग्रामस्थ व युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलांना बाहेर काढले. त्यानंतर ढवळपुरी येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यास सांगितले परंतु नगर येथे नेत असतानाच रस्त्यात दुर्देवी निधन झाले.
यातील ईस्माइल हा तृतीय वर्ष विज्ञान शाखेत व नावेद दहावीत आश्रमशाळेत शिकत होता, तर मोईन हा दुर्गादेवी विद्यालयात आठवीत शिकत होता. रात्री उशिरा ढवळपुरी येथे तिघांवर शोकाकुल वातावरणात अंतिम विधी करण्यात आले. या घटनेनंतर गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
मृतांची नावे: –
1) इस्माईल शब्बीर शेख (20 वर्षे)
2) नावेद नूरमहम्मद शेख (15 वर्षे)
3) मोईन निजाम शेख (14 वर्षे)



























































