एमडी, गांजासह पेडलर्स रंगेहाथ जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंबोलीत धडक कारवाई केल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकांनी मानखुर्द आणि कुर्ला परिसरात कारवाई करीत गांजा व एमडीचा साठा जप्त केला. या कारवाईत तीन ड्रग्ज पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार घाटकोपर युनिटचे एपीआय शिवडीकर, उपनिरीक्षक चारू चव्हाण आणि पथक मानखुर्द परिसरात गस्त घालत असताना पथकाला रामकृष्णा मूपनार (45) आणि अर्जुन विलास रेठे (34) या दोघांची हालचाल संशयास्पद वाटल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांच्या अंगझडतीत 2 किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. तर वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत व त्यांच्या पथकाने कुर्ला एलबीएस मार्गावरील इंद्रा नगरात कारवाई केली. पोलिसांनी नफिस सुलेमान खान (49) हा ड्रग्ज पेडलरला 21 ग्रॅम वजनाच्या एमडीसह रंगेहाथ पकडले.