
राजस्थानवरुन रत्नागिरी शहरात काम करण्यासाठी आलेले कारागीर लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. हाताला काम नाही आणि गावातून आणलेले पैसे संपल्याने गावी पायी जाण्यासाठी निघाले होते. मात्र, संगमेश्वर येथे आले असता पोलिसांनी त्यांना पकडले. या तीन कारागीरांकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने ते कामगार संगमेश्वर बस स्थानकात अडकून पडले आहेत. गेले तीन दिवस ते बसस्थानकात रहात आहेत. चंद्रकांत कुमावत, महाविर कुमावत आणि किशोर कुमावत अशी त्यांची नावे आहेत.
रत्नागिरी येथे हे तिघेही स्टाईल बसवण्याचे काम करण्यासाठी आले होते. मात्र, लॉकडाउनदरम्यान त्यांचे काम सुरू झालेच नाही. काम सुरु न झाल्याने त्यांनी गावातून आणलेले पैसे संपले. तसेच दररोजचा खर्च चालवायचा कसा अशी समस्या त्यांच्यासमोर उभी ठाकली. ते आणखी चारजणांना सोबत घेऊन गावी पायी निघाले होते. मात्र, ते संगमेश्वरला आले असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांच्यापैकी चार जणाना ठेकेदाराने परत नेले. या तिघांना ठेकेदाराने परत नेले नाही. त्यामुळे हे तिघे संगमेश्वरमध्ये अडकले आहेत. तीन दिवसांपासून ते बस स्थानकात रहात आहेत. संगमेश्वरातील काही राजस्थानी बंधूंनी त्यांना मदतीचा हात देत जेवणाची व्यवस्था केली. तसेच काही जेष्ठ व्यापारी मंडळीही त्यांना मदत करत आहेत. परंतु लवकरात लवकर त्यांच्या निवासाची व्यवस्था होणे गरजेचे आहे.



























































