दसऱ्याच्या धुण्याने घेतला पिता-पुत्र व पुतण्याचा जीव, डोहात बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या तिघा जणांचा सिंदफणा नदीच्या डोहात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. तिघांचे मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढले आहेत. शवविच्छेदनासाठी जातेगावच्या प्राथमिक रूग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. ही घटना नाथापूर-नांदलगाव येथे बुधवारी दुपारी साडेअकरा वाजता घडली.

सिंदफणा नदीच्या तिरावर असणाऱ्या नाथापूर-नांदलगाव येथे दुर्देवी घटना घडली. दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या तिघा जणांचा सिंदफणा नदीच्या डोहात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. शुभम लक्ष्मण गाडे यांचा पाय घसरल्याने ते पाण्याच्या डोहात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी वडील लक्ष्मण भगवानराव गाडे झटापटीने पुढे सरसावले. मात्र ते ही खोल डोहामध्ये बुडत असल्याचे पाहून पुतण्या गोविंद दत्ता गाडे यानेही उडी घेतली. मात्र दुर्देवाने या तिघांचा डोहात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच नांदलगाव ग्रामस्थांनी सिंदफणा नदीकडे धाव घेत या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जातेगावच्या प्राथमिक रूग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. या घटनेने नाथापूर-नांदलगावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.