मुंबईहून फिरण्यास आलेले तिघे कुंडलिका नदीत बुडाले

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रोहा तालुक्यातील बल्ले चिंचोली गावातील कुंडलिका नदी पात्रात तीन जण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. महेश अरुण जेजुरकर (39), परेश अरुण जेजुरकर (35 ), अक्षय शालिग्राम गणगे (29) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. या तिघांचा शोध घेण्याची मोहीम बचाव पथकाकडून सुरू आहे.

रोहा तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी संकेत पवार हे मुंबई वरून आपल्या काही मित्रांसह मुंबई येथून गावी आले होते. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संकेत पवार हे महेश जेजुरकर, परेश जेजुरकर, अक्षय गणगे यांच्यासह अन्य मित्राबरोबर गावातून वाहणाऱ्या कुंडलिका नदी पात्रात पोहण्यास गेले. त्यावेळी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने महेश, परेश व अक्षय हे तिघे बुडाले. त्यावेळी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सोबत आलेल्यांनी केला. मात्र ते या तिघांना वाचू शकले नाही. कुंडलिका नदी पात्रात तीन जण बुडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून रेस्क्यू टीमही पोहचून शोध कार्य सुरू केले आहे. मात्र अद्याप तिघांचा शोध लागलेला नाही.