
हल्लेखोर वन्यजीवांच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी मदत घेण्याच्या दृष्टीने ताडोब्यात प्रशिक्षित तीनहत्ती आणण्यात येणार आहेत. या कर्नाटककडून हस्तांतरणाबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या महिनाभरात हे नवे पाहुणे ताडोब्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र गजराजने वन कर्मचार्याला चिरडल्यानंतर या हत्तीच्या येण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेल्या काही वर्षात वाघासह अन्य वन्यप्राण्यांच्या वास्तव्यक्षेत्राचा संकोच झाला आहे. त्यातून मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागत असून गेल्या साडेसात वर्षात राज्यात वन्यजीवांच्या हल्ल्यात सुमारे तीनशेहून अधिक ग्राममस्थांचा बळी गेला आहे. तर तब्बल तीन हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात वन्यजीव हल्ल्याच्या 19 घटना घडल्या आहेत. त्यातील सर्व हल्ले हे वाघाने केले असून दोन हल्ले बिबटय़ाने केले आहे. तेव्हा मानव वन्यजीव संघर्ष जारी असताना त्यावर युद्धपातळीवर उपाययोजना करण्यांस वनविभागाने प्रारंभ केला आहे. कारण मोहफुलाचा हंगाम असो की तेंदूपत्ता गोळा करणे,या कालावधीत परिसरातील गावकरी जंगलात जातात. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना मोठय़ा प्रमाणावर घडतात.
तीन माहुतांना प्रशिक्षण देणार
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पिल्लांसह एकूण चार हत्ती आहेत. त्यात भर म्हणून कर्नाटकडून तीन नर हत्ती मागविण्यात आले आहेत. या हत्तीची नियमित देखरेख व रेस्क्यू ऑपरेशनसाठी मदत घेतली जाणार आहे. हस्तांतरणासाठी कर्नाटक सरकार व वनविभागाने परवानगी दिली आहे. हे सर्व प्रशिक्षित हत्ती आहेत. त्यांच्यासोबत तीन माहूत येणार असून येथेही सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




























































