
सामना प्रतिनिधी । शिरूर
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजींच्या टेमकर वस्तीत शेतात एकांती वस्ती करून राहणाऱ्या मनोहर काळे यांच्या घराचा दरवाजा कटावणी सारख्या हत्याराने तोडून अज्ञात चोरटयांनी त्यांच्या पत्नीस मारहाण करून गंभीर जखमी करीत घरातील ५० हजार रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे ६८ हजार रुपयांचा ऐवज लांबविला होता. या प्रकरणी सुधाकर काळे यांनी शिरूर पोलिसांत फिर्याद दिली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सचिन बारी यांनी शिरूर पोलीस स्टेशन सह गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखेने पोलीस पथक तयार करून आरोपींचा शोध सुरु केला असता या गुन्ह्यातील आरोपी अहमदपूर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख पदमाकर घनवट यांना मिळाली. त्यांच्या पथकाने सापळा रचुन या तीन आरोपींना ताब्यात घेतले.
सदर आरोपींनी आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पारगाव शिंगवे,मांदळवाडी रांजणी,वळती या सह पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर,बाभूळवाडा,म्हसे,निघोज येथे ही घरफोड्या केल्याची माहिती पोलीस पथकाला दिली आहे. पकडलेल्या आरोपींवर घरफोडी,जबरी चोऱ्या, दरोड्याची तयारी करणे व चोरी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असून कायदेशीर प्रक्रिया होणे बाकी असल्याने सदर आरोपींबाबत गुप्तता राखण्यात येत असल्याचे पदमाकर घनवट यांनी सांगितले आहे.

























































