
पवई येथे तन्वीर अब्दुल नदाफ या तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली होती. हत्येनंतर पळून गेलेल्या शशांत जाधव, विनोद ठाकूर आणि निकेश जाधवला युनिट 10 ने अटक करून पवई पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या तिघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
तन्वीर हा पवई परिसरात राहत होता. तो पवई तलावाजवळ फिरत असताना त्याचा एकाला धक्का लागला होता. तन्वीर आणि तीन जणामध्ये शाब्दीक वाद झाला होता. वादानंतर तन्वीरला लाकडी बांबू, बेल्टने मारहाण केली होती. त्यात तो जखमी झाला होता. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला. याचा समांतर तपास युनिट 10 करत होते. प्रभारी पोलीस निरीक्षक विजय घोरपडे यांच्या पथकाने तपास सुरु केला. मंगळवारी युनिट 10 च्या पथकाने तिघाना ताब्यात घेतले. त्या तिघांची कसून चौकशी केली. चौकशीत त्या तिघांनी मारहाणीची कबुली दिली. 20 ऑक्टोबरला तन्वीर तेथे आला. तेव्हा त्याला त्या तिघांनी पकडून मारहाण केली. त्या मारहाणीत तन्वीर हा जखमी झाला होता.



























































