बीडमध्ये लोखंडी जिन्यात वीज प्रवाह उतरला; शॉक लागून तिघांचा मृत्यू

1041

घराच्या टेरेसवर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्यामध्ये विजेचा प्रवाह उतरून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बीड शहरातील गोविंदनगर भागात घडली. सात वर्षाच्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलीचे वडील आणि काकांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली. घटनेने शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

बीड शहरातील गोविंदनगर भागामध्ये तुळशीराम वडमारे यांचे घर आहे. घरामागच्या पाठीमागच्या बाजूने टेरेसवर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या शेजारी वीजेचे मीटर आहे. मीटरच्या वायरला सपोर्ट करणारी लोखंडी तार जिन्याला बांधली गेली होती. सोमवारी सकाळी लोखंडी तारेवरून लोखंडी जिन्यामध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित झाला. त्याचवेळी श्रेया तुळशीराम वडमारे ( वय 7) हिचा जिन्याला हात लागला आणि तिला विजेचा शॉक बसला. मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलीचे वडील तुळशीराम वडमारे ( वय 32) धावत आले. मात्र, त्यांनाही विजेचा शॉक बसला. पिता आणि मुलीला शॉक लागल्याचे चुलता रमेश वडमारे ( वय 45) यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या दोघांना ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही या वीजप्रवाहाने खेचून धरले. या दुर्घटनेमध्ये एका चिमुरडीसह दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. या घटनेने बीड शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या