भांडणाच्या रागातून तिघांवर वार, दोघांना अटक, शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट परिसरातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडणाच्या रागातून कारागृहातून सुटून आल्यानंतर टोळक्याने तिघांवर खुनी हल्ला करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना 2 सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट परिससरात घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तौसिफ उर्फ अमन दस्तगीर शेख (22), अल्ताफ मोहमंद शेख (वय 20 दोघेही रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे पाच ते सहा साथीदार फरार आहेत. विकास सावंत, विकी लोखंडे आणि अजय लोखंडे अशी जखमींची नावे आहेत. उमेश सावंत (32) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश आणि त्यांचे भाऊ विकास हे 2 सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या टोळक्याने भांडणाच्या रागातून विकास, विकी आणि अजय यांच्यावर शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्याशिवाय अजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. धारधार शस्त्रे हवेत फिरवून हम जेल काट कर आये है, हमारा कोई बाल बाका नही कर सकता, अशी धमकी देउन परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करीत आहेत.