देवळ्याचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक, उपनिरीक्षकाला लाचप्रकरणी अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, देवळा

जमिनीचा वाद सोडविण्यासाठी लाचेची मागणी करणारे देवळ्याचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे व 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणारे सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.

देवळा तालुक्यातील भऊर येथील एका शेतकऱयाचा त्यांच्या नातेवाईकांसमवेत जमिनीचा वाद होता. अनेक वर्षांपासूनचा हा वाद सोडविण्यासाठी, तसेच नातेवाईकांवर कडक कारवाई करण्यासाठी तक्रारदाराने देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. या वादात कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांनी 16 फेब्रुवारीला पाच हजारांची, तर निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी 25 हजारांची लाच मागितली होती.

याबाबत तक्रार प्राप्त होताच विभागाच्या नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा रचला. सपकाळे यांनी 25 हजारांपैकी 10 हजार रुपये लाचेची रक्कम शेलार यांच्याकडे देण्यास सांगितली. तर शेलार यांनी स्वतःचे पाच हजार अशी एकूण 15 हजार रुपयांची मागणी करीत ती रक्कम देवळा पोलीस ठाण्याच्या आवारात स्वीकारली. त्याचवेळी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.