राफेलवरून गदारोळ होत असतानाच 3 विमाने हिंदुस्थानात दाखल

rafale-fighter-plane

सामना ऑनलाईन । ग्वाल्हेर

हिंदुस्थानी हवाईदलासाठी फ्रान्सकडून विकत घेण्यात यायच्या राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून देशात मोठा गदारोळ होत आहे. विरोधकांनी सत्ताधारी एनडीएला या प्रकरणी टीकेचे लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी फ्रान्सचे वैमानिक तीन राफेल घेऊन ग्वाल्हेरमध्ये दाखल झाल्याने सर्वच थरात आश्चर्य व्यक्त होत आहे. फ्रेंच वैमानिक ग्वाल्हेरच्या महाराजपूर हवाई स्थानकावरून हिंदुस्थानी लढाऊ वैमानिकांना राफेल उड्डाणाचे आणि त्यातील तांत्रिक सुविधा वापरण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. त्याबदल्यात हिंदुस्थानी वैमानिक फ्रांसच्या वैमानिकांना मिरज-2000 या लढाऊ विमानांच्या उड्डाणासह तांत्रिक प्रशिक्षण देणार आहेत. देशात आलेली तीन राफेल 3 दिवस येथे मुक्काम करणार आहेत.

संसदेत आणि संसदेबाहेर विरोधकांनी राफेल विमान खरेदी करारावरून केंद्रातील एनडीए सरकारला घेरले आहे. तरीही राफेल विमानाचा ताफा हिंदुस्थानात दाखल झाल्याने उच्च स्तरीय परवानगीनेच फ्रान्स आणि हिंदुस्थानी वैमानिकांनी प्रशिक्षण व तंत्रज्ञान आदानप्रदानाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा महाराजपूर एअर बेस हा हिंदुस्थानी हवाई दलाचा प्रमुख तळ मानला जातो. रविवारी राफेल आणि मिराज प्रशिक्षण मोहिमेची प्राथमिक तयारी पूर्ण करण्यात आली. राफेलच्या कार्यप्रणालीशी परिचित होण्यासाठीच हिंदुस्थानी वैमानिक फ्रेंच वैमानिकांकडून उड्डाण व तांत्रिक प्रशिक्षण घेणार आहेत.राफेल हिंदुस्थानात थांबण्याचे कारण खराब हवामान असे सांगितले जात असले तरी हा प्रशिक्षण कार्यक्रम सरकारच्या राफेल खरेदीच्या ठाम धोरणाचाच भाग असल्याचे उघड झाले आहे.

हिंदुस्थानी लढाऊ वैमानिकांना प्रशिक्षणासाठी फ्रान्सला पाठवणार
हिंदुस्थानी हवाई दलात 36 राफेल विमाने सामील करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यानुसार हिंदुस्थानच्या निवडक प्रशिक्षित लढाऊ वैमानिकांना राफेलच्या प्रशिक्षणासाठी फ्रान्सला पाठवले जाणार आहे. या विमानांच्या दोन स्क्वाड्रन हवाई दलात सामील होणार आहेत. त्यांची तैनाती हरियाणा आणि पश्चिम बंगाल राज्यात करण्याबाबत संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्थानी हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतिम चर्चा होत आहे.

36 राफेल टप्प्याटप्प्याने येणार
59 हजार कोटी रुपयांच्या राफेल खरेदी करारानुसार नोव्हेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत 36 राफेल विमाने हिंदुस्थानात येणार आहेत.ती टप्प्याटप्प्याने हिंदुस्थानी हवाई दलात सामील होणार आहेत. इंडो -फ्रान्स संरक्षण सहकार्य करारानुसार हिंदुस्थान आणि फ्रान्स एकमेकांना लढाऊ विमानांच्या उड्डाणाचे व तांत्रिक प्रशिक्षणाची देवाणघेवाण करणार असल्याचे फ्रांसच्या हिंदुस्थानातील राजदूतांनी स्पष्ट केले आहे. फ्रान्स त्यांच्याच मिराज- 2000 या हिंदुस्थानी ताफ्यात सामील झालेल्या विमानाचे नूतनीकरण कार्यही पार पाडणार आहे. त्याबदल्यात फ्रेंच वैमानिकांना मिराज उड्डाणाचे प्रशिक्षण हिंदुस्थानी वैमानिक देणार आहेत.

हिंदुस्थान -फ्रान्स लष्करी सहकार्य कराराला 20 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने फ्रांसच्या राफेल टीमने हिंदुस्थानात तीन दिवस मुक्काम करायचे ठरवले आहे. या मुक्कामात विमान उड्डाण व तांत्रिक माहिती देवाण घेवाणीचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले जाणार आहे.
-हिंदुस्थानातील फ्रेंच राजदूत