तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार

मोबाईल फोन,लॅपटॉप आणि इलेकट्रॉनिक वाहनांत वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीचा उपयुक्त अविष्कार साकारणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कारविजेत्या संशोधकांत 97 वर्षीय अमेरिकन प्राध्यापक जॉन गुडइनफ ,अमेरिकन रसायनतज्ज्ञ एम स्टॅनली व्हिटिंगम आणि जपानी संशोधक अकिनो योशिनो यांचा समावेश आहे.

रसायनशास्त्राचा नोबेल मिळविणाऱ्या संशोधकांनी लिथियम आयन बॅटरीचा शोध लावल्याने बिनतारी आणि पेट्रोलियमविरहित सुरक्षित ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे. हि बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज करता येणे शक्य असल्याने ती मोबाईल. लॅपटॉप आणि इ – वाहने वापरणाऱ्यांसाठी मोठी संजीवनीच ठरली आहे. या बॅटऱ्या सौर किंवा पवन ऊर्जेच्या सहाय्यानेही चार्ज करता येतात.त्यामुळे ऊर्जा क्षेत्रात प्रदूषण विरहित ऊर्जास्त्रोताच्या वापराला अधिक वाव मिळणार असल्याचे नोबेल निवड समितीने वरील तीन शास्त्रज्ञांची पुरस्कारासाठी निवड जाहीर करतांना सांगितले.

1970 ला लागला आयन बॅटरीचा शोध

पेट्रोलियम इंधनाने जगात होणारे प्रदूषण कमी करण्याचा आणि तेल टंचाईला पर्याय शोधण्याची मोहीम राबवितांना शास्त्रज्ञांना 1970 मध्ये आयन बॅटरीचा आविष्कार सापडला. प्रोफेसर व्हिटिंगम यांच्या पेट्रोलियममुक्त इंधन शोधण्याच्या प्रयोगातूनच लिथियम बॅटरीच्या शोधाला चालना मिळाली. त्यातूनच पुढे आताची हायटेक मोबाईल बॅटरी विकसित झांकी आहे. यंदाचा 2019 चा रसायनशास्त्राचा नोबेल मिळविणाऱ्या तीन संशोधकांत पुरस्काराची 90 लाख स्वीडिश क्रोनर ( 9 लाख 14 हजार डॉलर ) हि रक्कम विभागून देण्यात येणार असल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सेक्रेटरी जनरल गोरान हॅन्सन यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या