ब्रह्मांड विज्ञान, एक्झोप्लॅनेटच्या शोधासाठी तिघांना भौतिकशास्त्राचे नोबेल

549

यंदा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी स्वित्झर्लंडचे मिशेल मेयर, दिदिएर क्वेलोज आणि कॅनडियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जेम्स पीबल्स हे ठरले आहेत. जेम्स पिबल यांना ब्रह्मांड शास्त्रातील संशोधनासाठी तर सूर्यमालिकेबाहेर एका ग्रहाचा शोध घेतल्याबद्दल मिशेल मेयर, दिदिएर क्वेलोज यांना संयुक्तरीत्या पुरस्कार दिला जाणार आहे.

स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये सोमवारपासून यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. मंगळवारी भौतिकशास्त्रातील पुरस्कार जाहीर झाले. 14 ऑक्टोबरपर्यंत एकूण सहा क्षेत्रांतील पुरस्काराच्या मानकऱयांची नावे जाहीर केली जाणार आहेत. नोबेल हा जगभरातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी एक पुरस्कार मानला जातो. सोमवारी वैद्यकशास्त्रातील कामगिरीबद्दल अमेरिकेतील विलियम जी. केलिन ज्युनियर आणि ग्रेग एल सेमेन्जा तसेच ब्रिटनच्या सर पीटर जे. रॅटक्लिफ यांचा नोबेल पुरस्काराने गौरव केला जाईल, असे घोषित करण्यात आले होते. त्यापाठोपाठ मंगळवारी भौतिकशास्त्रातील पुरस्कारार्थीची नावे जाहीर करण्यात आली.

शांती पुरस्कारासाठी थनबर्ग प्रबळ दावेदार

यंदाच्या शांती पुरस्कारासाठी 16 वर्षीय स्वीडिश जलवायू कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग ही प्रबळ दावेदार मानली जात आहे. जलवायू परिवर्तन रोखण्यासाठी ती जगभरात अभियान राबवत आहे. तिला हा पुरस्कार जाहीर झाला तर ती हा पुरस्कार मिळवणारी सर्वात कमी वयाची मानकरी ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या