कश्मीर खोऱ्यात चकमक, पुलवामा आणि श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीर खोऱ्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. पुलवामात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त खबर मिळताच सुरक्षा दलांनी संपूर्ण जंगल परिसर पिंजून काढत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडील दारूगोळा व शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.

गुरुवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील नैना बाटपोरा येथे पहिली चकमक झाली. यात दोन दहशतवादी मारले गेले. लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली. संपूर्ण परिसरात नाकाबंदी केल्याचे कळताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला सडेतोड उत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. दोन्ही दहशतवादी ‘लश्कर-ए-तोएबा’शी संबंधित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, श्रीनगरच्या हजरतबल भागात एका दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात आले, तर दोघे पळून गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी ‘सर्च ऑपरेशन’ सुरू ठेवण्यात आले आहे.