तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद; पुलवामात चकमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात एक जवान शहीद झाला. पुलवामामधील डालीपोरा भागात ही चकमक झाली. नासीर पंडित, उमर मीर आणि खालीद अशी या तीन दहशतवाद्यांची नावे असून ते तिघेही जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी होते.

गुरुवारी सकाळी हिंदुस्थानी लष्कराला पुलवामाच्या डालीपोरा भागात दहशतवादी लपले असल्याची खबर मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चमकक उडाली. यात तीन दहशतवादी मारले गेले तर एक जवान शहीद झाला.

गोळीबारात तरुणाचा मृत्यू; संचारबंदी लागू

जम्मू-कश्मीरमधील भद्रवाह खोऱ्यात गोळीबाराच्या घटनेत नईम हा तरुण ठार झाला. त्यानंतर संतापलेल्या लोकांनी आंदोलन केले. त्यांनी घरांवर दगडफेक केली आणि काही दुकानेही फोडली. पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र जमावाने पोलिसांवरच दगडफेक करायला सुरुवात केल्यानंतर प्रशासनाने या परिसरात संचारबंदी लागू केली. या भागातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. तरीही परिसरात तणावपूर्ण स्थिती कायम आहे. पोलीस आता नईमच्या मृत्यूचे नेमके कारण शोधत आहेत. बुधवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी त्याची गोळ्या घालून हत्या केली. नईमचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून त्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण कळू शकेल असे पोलिसांनी सांगितले.