
धक्का लागल्याच्या किरकोळ कारणामुळे टोळक्याने माय-लेकाराला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवारी हडपसरमधील गाडीतळ परिसरात घडली. याप्रकरणी गणेश डोंगरे (वय 21, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि त्यांची आई सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी वसाहतीसमोरील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी गणेश यांचा एकाला धक्का लागला. त्याचा राग आल्यामुळे त्याने इतर साथीदारांना बोलावत गणेशला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यावेळी त्यांच्या आईने भांडणात मध्यस्थी केली असता, आरोपींनी त्यांना दांडक्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक थोरात अधिक तपास करीत आहेत.


























































