
दिवा डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चोरी छुपके कचऱ्याचे डंपर या ठिकाणी रिते केले जात असून डम्पिंगवरील धुराने परिसरातील नागरिकांचा कोंडमारा सुरूच आहे. त्यामुळे मिंध्यांच्या घोषणेचा महापालिका प्रशासनाने ‘कचरा’च केला आहे. दरम्यान, डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची घोषणा करूनही कचरा टाकला जात असल्याने ही दिवावासीयांची घोर फसवणूकच असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
दिवा डम्पिंग ग्राऊंड बंद करावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवासी आवाज उठवत आहेत. महापालिका निवडणुका जवळ आल्या की दिवा डम्पिंगला टाळे लावण्याची जुनीच टेप मिंधे व भाजपकडून वाजवली जाते. वर्षानुवर्षे दिवावासीयांची ही फसवणूक सुरूच आहे.
शिवसेनेने उठवला आवाज
दिवा शहरातील डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवा शहर महिला संघटक ज्योती पाटील यांनी पालिका आयुक्तांना पत्र देत यावर सवाल उपस्थित केला आहे. छुप्या मार्गाने टाकला जात असलेला कचरा तत्काळ थांबवा. डम्पिंग बंद करण्याची घोषणा करून कचरा टाकला जात असल्याने ही दिवावासीयांची फसवणूक आहे असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.
मिंध्यांनीदेखील मतांवर डोळा ठेवून दिवा डम्पिंग बंदची घोषणा केली होती. मात्र या डम्पिंग ग्राऊंडवर गेल्या काही महिन्यांपासून छुप्या मार्गाने कचरा टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मिंध्यांनी केलेल्या या बनवाबनवीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला असून अजून आम्ही किती वर्षे धूरकोंडीचा त्रास सहन करायचा, असा सवाल केला आहे.
ही तर दिवावासीयांची घोर फसवणूक
डम्पिंग ग्राऊंडमुळे दिव्यातील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. हवेची गुणवत्ता ढासळली आहे. मात्र पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना या महत्त्वाच्या मुद्द्यावर गेली अनेक वर्षे केवळ राजकारण सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे हे डम्पिंग बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही महापालिका व ठेकेदार छुप्या मार्गाने कचरा टाकत असल्याने संताप व्यक्त होत असून ही तर दिवावासीयांची घोर फसवणूक आहे अशी टीका केली जात आहे.