ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार; गावकऱ्यांमध्ये दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा रामपुरी (मेंडकी) येथील जानकीराम शंकर भलावी (वय 50) नेहमीप्रमाणे पत्नीसोबत सकाळी 7.30 वाजता एकारा जंगलात मोहफुल गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांचे शरीर अर्धा किलोमीटर अंतरावर ओढत नेले आणि त्यांच्या शरीराचे लचके तोडले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

पतीचा आवाज येत नसल्याने जवळच मोहफुल वेचणाऱ्या त्यांच्या पत्नीने आवाज दिला. मात्र, प्रतिसाद आला नाही म्हणून त्या बघायला आल्या असत्या जानकीराम यांच्या चपला पडलेल्या दिसल्या. वन्य प्राण्याने जमीनीवरून ओढत नेल्याच्या आणि रक्ताच्या खुणा दिसल्या. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करून मोहफुले वेचणाऱ्या इतर मजुरांना बोलावले. जंगलात शोध घेण्यास सुरुवात केल्यावर अर्धाकिलोमीटरवर त्यांचा मृतदेह आढळला. वाघाने त्यांच्या शरीराचे लचके तोडले होते. वाघाच्या हल्ल्यामुळे रामपूरी, एकारा व इतर परिसरात लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

वाघाच्या वावरामुळे मोहफुल गोळा करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मजूरांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुढे शेतात कसे जायचे अशी चिंता त्यांना सतावत आहे. वनविभाग व प्रशासनाविरोधात स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी पद्मापूर, हळधा, बोडदा, आवळगाव, चिंचगाव, मुरपार, गोगाव, सायगाव या परिसरात वाघाच्या हल्ल्यात काही लोकांचे बळी गेले आहेत. मात्र, वनविभाग कारवाई करत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. किसान सभेचे नेते कॉ. विनोद झोडगे यांनी काही दिवसांपूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेत त्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले होते.