वाघांना शांतपणे जगू द्या! मेळघाटात ब्रॉडगेज रेल्वेमार्ग नको, मुख्यमंत्र्यांचे रेल्वेमंत्री-पर्यावरण मंत्र्यांना पत्र

990

देशात जाहीर केलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामुळे  मेळघाटात वाघांचे संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला खांडवा प्रस्तावित रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करू नका, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल व केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना केली आहे.

ह रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा या 176 किमी रेल्वे मार्गाला मीटर गेजमधून ब्रॉडगेज मध्ये करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या रेल्वे मार्गाला लागून 23. 48 किमीचे रिअलाईनमेंटही करावे लागेल पण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्याऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन केले तर वाघांच्या अधिवासाला धक्का लागणार  नाही.

ह दुसरीकडे  जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांसह शेजारच्या 100 गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

वन्य जीव संस्थेचीही शिफारस

भारतीय वन्यजीव संस्थेने देखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी  भागातून करावे अशी सूचना केली आहे. केंद्रीय समितीने वन्यजीव राष्ट्रीय बोर्डास देखील मेळघाट प्रकल्पाच्या  वान अभयारण्यातील 160. 94  हेक्टर  वन जमीन रेल्वे मार्ग परिवर्तनासाठी देण्याबाबत पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. बोर्डाने राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवून विचार करावा असे कळविले आहे.

ह रेल्वे मार्गांचा विकास करताना विशेषत: मेळघाटमध्ये वाघांचे संवर्धन आणि येथील पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे तितकेच महत्वाचे आहे, त्यामुळे ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा. व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही प्राधान्य दिले आहे.

वाघांच्या अधिवासाला धोका

प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे या भागातील रेल्वे वाहतूक वाढेल परिणामी वन्य प्राण्यांच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या