
चंद्रपूर जिल्ह्यातील सुशी दाबगाव इथं सापडलेल्या वाघाच्या बछड्याची कोरोना चाचणी आता नागपुरात होणार नाही. चंद्रपूरच्या मूल तालुक्यात 24 एप्रिल रोजी एक 4 महिन्यांचा बछडा शेतात सापडला होता.
ICMR ने अधिकृत केलेल्या देशातील तीन प्रयोगशाळेतच बछड्याच्या स्वॅबची तपासणी करावी लागणार आहे. या प्रयोगशाळा भोपाळ, बरेली आणि हरयाणातील हिसार इथं आहेत. यामुळे नागपूरच्या प्रयोगशाळेने या बछड्याची कोरोना टेस्ट करण्यास नकार दिला असून, स्वॅब चे नमुने परत नेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता चंद्रपूर वनविभाग हे नमुने आता जवळ असलेल्या भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. या अडचणीमुळे आता या बछड्याच्या चाचणीला आणखी उशीर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.























































