
महाराष्ट्रासह हरयाणामध्ये याच महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. हरयाणामध्ये भारतीय जनता पक्षाने टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हिला तिकीट देण्यात आले आहे. आमदमपूर मतदारसंघातून तिला उमेदवारी मिळाली आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी उशिरा रात्री आपली दुसरी आणि अंतिम यादी जाहीर केली. यादीमध्ये सोनाली फोगाट हिच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. आदमपूर मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळाल्याने ती अचानक चर्चेमध्ये आली आहे. या ठिकाणी तिचा सामना काँग्रेसच्या कुलदीप बिश्नोई यांच्याशी होणार आहे. 2014 मध्ये कुलदीप बिश्नोई यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना करून निवडणूक लढवली होती आणि विजयीही झाले होते. यानंतर नुकताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कोण आहे सोनाली?
सोनाली ही टिकटॉकवरील प्रसिद्ध व्यक्ती आहे. लाखो लोक तिला फॉलो करतात. वेगवेगळे व्हिडीओ ती टिकटॉकवर पोस्ट करत असते. तिच्या व्हिडीओला हजारो लोक लाईकही करतात. याचाच फायदा उचलण्यासाठी भाजपकडून तिला उमेदवारी मिळाली असण्याची शक्यता आहे.
90 जागांसाठी मतदान
हरयाणा विधानसभेसाठी 90 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्राप्रमाणेच येथेही 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली असून दोन भागामध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. हरयाणात भाजपने ‘स्पोर्ट कार्ड’ही खेळले आहे. येथे ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त, महिला कुस्ती खेळाडू बबिता फोगाट, हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग यांनाही तिकीट दिले आहे.
Second list of BJP candidates for the ensuing General Election to the Legislative Assembly of Haryana. pic.twitter.com/XfVmkxOAj8
— BJP (@BJP4India) October 2, 2019





























































