मुद्दा – स्पर्धा परीक्षांचे मृगजळ  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांतील घटना पाहता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारख्याच विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा संवेदनशील व नाजूक विषय झाला आहे . तो अतिशय गंभीरपणे हाताळायला हवा. जेव्हा एमपीएससी किंवा यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर होतो तेव्हा प्रसारमाध्यमांत शेतकऱ्याची मुलगी , रिक्षाचालकाचा मुलगा, दुष्काळी भागातील मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा अधिकारी झाला अशा बातम्या झळकतात. या बातम्या देण्यामागचा उद्देश सकारात्मक असला तरी त्याचा विपरीत परिणामदेखील जनमानसावर होतो. प्रत्येकालाच आपला मुलगा किंवा मुलगी अधिकारी व्हावा असे वाटायला लागते. यात वावगे काहीच नसले तरी त्यासाठी लागणारी आर्थिक, बौद्धिक व मानसिक क्षमता आपल्या पाल्याकडे आहे का? याचा विचार  करताना पालक  दिसत नाहीत . कळपातल्या मेंढरांप्रमाणे बऱ्याच जणांची अवस्था होते. याच्याच जोडीला काही शहरांतील खासगी शिकवणी वर्गातून स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या मुलाखतीवजा कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामध्ये यशस्वी उमेदवारांनी पार्टटाईम जॉब (अर्धवेळ नोकरी ) करून व प्रसंगी वडापाव खाऊन वा उपाशीपोटी राहून कसे यश मिळवले याच्या कथा उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना ऐकवल्या जातात. याची भुरळ पालक व विद्यार्थ्यांना पडते. शहरातील खासगी कोचिंग क्लासेसचे अवाच्या सवा शुल्क भरण्यासाठी  काही पालक कर्ज काढतात किंवा आपली जमीन विकतात. अशा प्रकारे एकीकडे पालकांनी काढलेले कर्ज व दुसरीकडे स्पर्धा परीक्षेतील यशाची अशाश्वतता यांच्या कात्रीत विद्यार्थी अडकतो. मग कधी कधी त्याचे पर्यवसान आत्महत्येसारख्या टोकाच्या घटनेत होते. स्पर्धा परीक्षांत येणाऱ्या अपयशामुळे काही विद्यार्थी वाईट मार्गाला लागतात किंवा व्यसनांच्या आहारी जातात. स्पर्धा परीक्षांच्या मृगजळामागे धावणाऱ्या अशा या पालकांचे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे आता गरजेचे झाले आहे. त्यांना स्पर्धा परीक्षेतील अत्यल्प संधीची व सामाजिक वास्तवाची जाणीव करून देणे अपरिहार्य बनले आहे. एखादी शैक्षणिक पदवी संपादन करुन आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल अशी एखादी नोकरी वा एखादा स्वयंरोजगार करून उर्वरित वेळेत, किंबहुना समांतर बाब म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी करायला काहीच हरकत नाही, पण ऐन उमेदीची दहा-बारा वर्षे  शेतीवाडी विकून, महागडे क्लास लावून स्पर्धा परीक्षांच्या मृगजळामागे धावणे अरिष्टाला आमंत्रण देण्यासारखेच ठरेल. काही मुले तर त्यांना स्पर्धा परीक्षांत अजिबात स्वारस्य नसताना केवळ आईवडिलांच्या हौसेखातर नाइलाजाने अशा परीक्षांना बसतात. हेदेखील दुर्दैवी आहे. यातून काय साध्य होणार आहे? खरे तर स्पर्धा परीक्षांत यशस्वी होण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा पक्का पाया, अवांतर वाचन, कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटी या गोष्टी आवश्यक असतात. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या निम्म्याअधिक विद्यार्थ्यांकडे या गोष्टींची सुरुवातीपासूनच वानवा असते. मग ते यशस्वी कसे होणार?

>> टिळक उमाजी खाडे