
प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेआधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झालाय. कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला. एका महिलेला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवणे पेनला भोवले आहे. या सेक्सटिंगच्या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) चौकशी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता टीम पेनने शुक्रकारी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. ऍशेस मालिकेसाठी उपकर्णधार पॅट कमिन्सकडे ऑस्ट्रेलियन संघाची धुरा जाणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी होबार्ट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये टीम पेनने ही माहिती दिली. तो म्हणाला, 2017 मधील हे प्रकरण संपले असावे असे मला वाटले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट टांस्मानियाने मला आधीच क्लीन चिट दिलेली होती. त्यामुळे माझे संपूर्ण लक्ष या संघाच्या बांधणीवर होते. मात्र माझे खासगी मेसेज हे सार्जवनिक झाले असल्याचे मला नुकतेच समजले आहे. पाच वर्षांपूर्वी माझ्याकडून झालेल्या कृत्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावर राहण्यासाठी पात्र नाही असे टीम पेनने म्हटले.




























































