त्वचेवरील डागांकडे दुर्लक्ष करू नका! असू शकतो कर्करोगाचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुदृढ आरोग्याची झलक निरोगी, नितळ त्वचेतून झळकते. त्यामुळे त्वचा नितळ राखायची असेल तर आरोग्याकडे लक्ष देणं हे सगळ्यांसाठीच गरजेचं असतं. पण, त्वचेतून फक्त सुदृढताच झळकते असं नाही. बऱ्याचदा आपल्याला होणाऱ्या काही आजार किंवा विकारांचे संकेतही त्वचा आपल्याला देत असते.

कोणाचीही त्वचा संपूर्णतः नितळ नसते. त्यावर छोटे डाग, तीळ, खड्डे, लव असतातच. पण, चेहऱ्यावर जर नेहमीपेक्षा वेगळे डाग दिसत असतील तर मात्र, ती कर्करोगाची चाहुल असण्याची शक्यता असते.

मेलानोमा, बेसल सेल कार्किनोमा आणि स्क्वामस सेल कार्किनोमा यासारखे त्वचेच्या कर्करोगाचे विकार त्वचेवरील अनपेक्षित झालेल्या बदलांमुळे होऊ शकतात. यासाठी त्वचेवर पडणाऱ्या कोणत्याही डागांकडे दुर्लक्ष करू नका.

कोणत्या प्रकारचे डाग असू शकतात घातक

एक्टोनिक कॅराटोसिस –

सूर्यकिरणांच्या जास्तीत जास्त वेळ संपर्कात आल्याने त्वचेवर डाग पडू शकतात. हे डाग डोकं, नाक, हात तसेच शरीराच्या कोणत्याही भागावर पडू शकतात, मात्र या डागांचे रुपांतर किती कालावधीनंतर कर्करोगात होऊ शकते असे सांगता येत नाही.

म्हणून डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेणे आवश्यक आहे. उजळ त्वचा, लाल रंगाचे केस आणि घारे डोळे असणाऱ्या व्यक्तिंनी जास्त काळजी घ्यावी, असे एका संशोधनात म्हटले आहे.

एक्टिनिक चेईलिटिस –

याची सुरुवात खालच्या ओठावर होते. यामध्ये ओठांवर पापडीसारखा पॅच येतो. काहीवेळा ओठांना सूज येते.

क्युटेनियस हॉर्न –

या डागाचा आकार कसाही असू शकतो. सूर्यकिरणांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये हा आजार जास्त असतो.

तीळ –

शरीरावर दिसणाऱ्या तीळात जर बदल दिसू लागला तर दुर्लक्ष करू नका. कारण या समस्येमुळे मेलानोमा हा त्वचाविकार होऊ शकतो. याचा आकार कोणत्याही रंगाचा आणि खोडरबराच्या आकाराइतका मोठा होऊ शकतो.

डाइप्लास्टिक नेवी –

त्वचेवर जन्मत:च तीळ असतो, मात्र ते तेव्हा जरी कर्करोगाचे नसले तरी नंतर यामुळे कर्करोग होऊ शकतो. या डागांचा रंग गुलाबी, लाल, चॉकलेटी असतो.

शरीरावर तीळ असणे सर्वसाधारण बाब मानली जाते, मात्र तीळाच्या आकारात आणि रंगात बदल होत असेल किंवा त्याच्या बॉर्डरला तडे जात असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच त्वचारोगतज्ज्ञाचा सल्ला घ्या.