आनंदी उपवासासाठी काही टिप्स

1890

‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ ही म्हण तंतोतंत खरी आहे. उपवासाच्या दिवशी तळलेले, तुपकट पदार्थ, साबुदाणा, बटाटा आणि दाण्याचे कूट यांचा भरपूर वापर आणि चहा, कॉफीबरोबर वेफर्स, चिवडा असे पदार्थ अनेकजण खातात, पण या सर्व पदार्थ खाल्ल्याचा परिणाम म्हणजे पित्त वाढणे, उष्णता वाढणे, पोटदुखी, उलट्या, डोकेदुखी असे अनेक त्रास होतात आणि अशा प्रकारे केलेल्या उपवासाने शरीराला फायदा न होता त्रासच होतो. शास्त्रानुसार उपवास म्हणजे लंघन म्हणजेच पचनक्रियेला आराम देणे. यामुळे पचन सुधारते. शरीर हलके वाटते व उत्साह निर्माण होतो. उपवासाच्या दिवशी खाण्यासारखे काही आरोग्यदायी आणि पचायला हलके पदार्थ निवडले तर उपवासाचा त्रास होत नाही.

उपवासाचा शरीराला त्रास होऊ नये म्हणून काय करावे?

  • उपवासाच्या आदल्या दिवशी समतोल पण हलका आहार खावा. दुसर्‍या दिवशी उपवास आहे म्हणून जास्त किंवा उशीरा जेवणे अयोग्य आहे.
  • सकाळी पहिल्यांदा एक ग्लास पाणी पिऊन एखादे फळ व सुका मेवा खाऊन दिवसाची सुरुवात करावी.
  • प्रत्येक तीन तासांनी काहीतरी हलके खावे.
  • न्याहरी करताना पिष्टमय पदार्थ कमी खावे. म्हणून साबुदाणा व बटाटा यांचा वापर कमीच करावा.
  • जेवणात साबुदाणा खिचडी, वडे, दाण्याचा कूट यांचा समावेश न करता भाकरी, भाजी व दही असा हलका आणि सात्विक आहार खावा. दाण्याचे कूट चमचाभर वापरावे.
  • मधल्या वेळेस दही, ताक, लिंबू पाणी, कोकम सरबत, फळांचा मिल्कशेक साखर विरहीत असे घ्यावे. हे पदार्थ पचायला हलके असतात.
  • दुपारच्या व रात्रीच्या जेवणात भेंडी, भोपळा, काकडी, सुरण, रताळे, कंद अशा भाज्यांचा समावेश करावा. बरोबर राजगिरा, शिंगाडा भाकरी किंवा वरी तांदुळ खावे.
  • मधल्या वेळी भूक लागल्यास सुका मेवा किंवा फळांचा समावेश करावा.

 उपवासात कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा?

  1. राजगिरा लाह्या व राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, उपवास भाजणी, वरीचे तांदूळ, दूध, दही, ताक, फळे, भाज्या, प्रमाणात शेंगदाणा, सुका मेवा, खजूर यांचा समावेश करावा.
  2. साबुदाणा, बटाटा, तळलेले पदार्थ, वेफर्स, चिवडा, उपवासाची बिस्कीटे, अधिक प्रमाणात दाण्याचे कूट किंवा तयार फळांचा रस, चहा, कॉफी यांचा आहारात समावेश वर्ज्य असावा.
आपली प्रतिक्रिया द्या