21 मोदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

21 मोदक

हा दिवसांचे बाप्पा घरोघरी ऐसपैस पाहुणचार घेत आहेत. मोदक त्यांच्या आवडीचे आणि आपल्याही. गूळ खोबऱ्याच्या उकडीच्या मोदकांखेरीज इतर अनेक प्रकारे बाप्पाचा नैवेद्य सजवता येतो. पाहूया मोदकांचे विविध प्रकार…

पनीरचे मोदक

मैद्यात मोहन घालून मळून थोडावेळ तसेच ठेवा. पनीरमध्ये साखर, ड्राय फ्रूट्स, वेलची पावडर टाकून सारण तयार करा. मैद्याच्या पुऱ्या लाटून पनीरचे सारण भरून मोदक तयार करा. तुपात तळून घ्या.

खव्याचे मोदक

खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करतात.

बेक केलेले मोदक

खोबरं, किसमिस, खव्याचे सारण करून मैद्याच्या पारीमध्ये भरून बेक करावे.

गूळ कोहळ्याचे मोदक

गूळ, लाल कोहळा व तेवढीच कणिक घेऊन एकत्र मळावे. मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळावे.

पुरणाचे मोदक

मैद्यामध्ये तेलाचे मोहन आणि मीठ एकत्र करून घट्ट मळून घ्या. त्यात पुरणपोळीचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मोदक तळून घेतात किंवा वाफवूनसुद्धा घेतात.

फ्रूट मोदक

वेगवेगळय़ा प्रकारची फळे मिक्स प्रूट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

संदेश मोदक

पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे.

मनुकांचे मोदक

मनुका, काजू एकत्र करून त्यात थोडी दूध पावडर घालून त्याचे मोदक वळावे.

तीळगुळाचे मोदक

गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावे व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावे किंवा तीळ व गुळाचे जे सारण आहे ते थोडे गरम असतानाच साचामध्ये घालून त्याचे मोदक करावे.

खोबरं मैद्याचे मोदक

रवा, खोबरं, खवा, साखर एकत्र करून हे सारण मैद्याच्या वाटीत भरून मंद आचेवर तळावेत.

कॅरामलचे मोदक

पनीर, खवा, काजू, किसमिस, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरामलमध्ये बुडवून थंड करून सर्क्ह करावा.

काजूचे मोदक

काजू कतलीसाठी वापरण्यात येणारे सारण तयार करून त्यात खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा.

फुटाण्यांचे मोदक

फुटाणे बारीक करून त्यात साखर आणि तूप घालून चांगले मळावे या पिठाला मोदकाचा आकार द्यावा. हे मोदक गरम न करता तसेच खावेत.

तांदळाचे गुलकंदी मोदक

तांदळाच्या उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून हे मोदक मंद आचेवर तळून घ्यावे किंवा वाफवून घ्यावे.

पोह्यांचे मोदक

पोहे चांगले भिजवून त्याचा गोळा मळावा. त्यामध्ये आपल्याला हवे ते सारण भरून मंद आचेवर तळावे.

चॉकलेटचे मोदक

खवा, खोबरं, शेंगदाणे बारीक करून मळून घ्या. त्यानंतर याला मोदकाचा आकार द्यावा. मोदकांना हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून थंड करून सर्क्ह करा.

शेंगदाण्यांचे मोदक

गूळ आणि शेंगदाणे एकत्र करून त्यात काजू, किसमिस घालावे व उकडलेला बटाटा व साबुदाण्याच्या पिठाच्या पारीमध्ये भरून तळून घ्यावे.

बटाट्याचे मोदक

बटाट्यामध्ये खवा, साखर, काजू, किसमिस घालून त्याचा हलवा बनवावा व साच्यामध्ये घालून मोदक करावे. वरून दुधाची पावडर लावावी.

पंचखाद्याचे मोदक

पंचखाद्य एकत्र करून हे सारण मैद्याच्या पारीत भरून डीप फ्राय करा.

बेसनाचे मोदक

बेसनाच्या लाडूचे सारण साच्यात घालून मोदकाचा आकार द्यावा आणि त्यात एक काजू भरावा.

डिंकाचे मोदक

डिंक तळून डिंकाच्या लाडवाचे मिश्रण करावे. हे मिश्रण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.