मतदारांनो, मतदानाला जाताना या गोष्टी कराच!

मुंबईसह राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी उद्या, 15 जानेवारीला मतदान होत आहे. जे लोक मतदार आहेत, त्यांनी मतदानाला जाताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवायला हव्यात. त्यामुळे मतदान केंद्रावर गेल्यानंतर गोंधळ उडणार नाही, तसेच काही गोष्टींमुळे पश्चाताप होणार नाही.

1 मतदानाला जाण्याआधी मतदानाची वेळ किती ते किती आहे हे आदल्या दिवशीच तपासून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे मतदानाला जाण्याची वेळ निश्चित करू शकता.

2 मतदानाला जाताना सर्वात आधी तुमचे फोटो असलेले ओळखपत्र मतदान केंद्रावर सोबत घेऊन जा.

3 मतदाराची माहिती असलेली स्लिप सोबत ठेवा. जर तुमच्याकडे स्लिप नसेल तर ती मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर उपलब्ध असेल. ती स्वतःकडे ठेवा.

4 निवडणूक आयोगाने जाहीर केलेले कोणतेही एक ओळखपत्र ज्यामध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, फोटोसह पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, राज्य किंवा केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं सेवा ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तावेज, एनपीआरअंतर्गत भारताच्या रजिस्ट्रार जनरलने जारी केलेले स्मार्टकार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, खासदार, आमदार किंवा एमएलसींना दिलं जाणारं अधिकृत ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा.

याकडे आवर्जून लक्ष द्या

मतदान केंद्रावर जाताना सोबत मोबाईल घेऊन जाऊ नका. बऱयाच ठिकाणी मतदान पेंद्रावर सुरक्षा रक्षक मोबाईल नेण्यास बंदी घालतात. त्यामुळे वाद निर्माण होतात. ज्वलनशील वस्तू किंवा धारदार वस्तू जसे की लायटर, चापू खिशात बाळगू नका. मतदानाच्या दिवशी अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मतदान शांततेत करा आणि घरी या. मतदानाच्या दिवशी कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणे टाळावे. कोणाशीही वाद होणार नाही याची काळजी घ्या. मतदान हे शांततेत पार पडायला हवे याची काळजी घ्या.