
>> डॉ. जितेंद्र घोसाळकर
पावसाने काढता पाय घेतला आहे. ऑक्टोबर हीटने आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे आणि ऋतुबदलाचा हा परिणाम आपल्या सगळ्यांच्याच प्रकृतीवर दिसू लागलाय… कसे सांभाळावे स्वतःला… ऑक्टोबरच्या उन्हाळ्यापासून…
ऑक्टोबर महिना म्हटला की दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री तगमग. ही अशी हवा शरीराला धोकादायकच… याच दिवसांत काही रोग डोके वर काढतात. उन्हाळ्यात जसे उन्हाचे चटके बसतात, तसेच चटके ऑक्टोबर महिन्यात असले तरी ही हवा कोरडी असते. या ऋतुबदलामुळे हे आजार बळावतात. म्हणून या उष्माघातापासून बचाव करून घेतला पाहिजे.
उष्माघात आणि ताप येणे या भिन्न प्रक्रिया आहेत. ताप येण्यामध्ये शरीराचे तापमान नेहमीहून अधिक राहते. व्याख्येप्रमाणे उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान 38.1 पेक्षा अधिक किंवा त्याहून अधिक तापमानाला स्थिर राहणे. सामान्यपणे दुपारी शरीराचे तापमान 37.70 सेल्सियस असते. उष्माघातामध्ये हे तापमान 40 सेल्सियस होते.
उष्माघात दोन प्रकारचा होतो. एका प्रकारात बाह्य तापमानामुळे शरीराचे तापमान काढते. ते नेहमीच्या उपायांनी कमी होत नाही. आणि दुसरा बाह्य तापमान अधिक असता शारीरिक कष्टाची कामे करताना किंवा उन्हाळ्यात व्यायाम करताना होतो. शारीरिक कष्टाची कामे करताना स्नायूंच्या चयापचयामुळे आधीच शरीर अधिक उष्णता निर्माण करते. उष्ण आणि दमट हवेत शरीर थंड ठेवण्याची यंत्रणा काम करीत नाही. हा अनुभव ऐन उन्हाळ्यात खेळाच्या स्पर्धा घेताना येतो. यात भर घालणाऱ्या बाबी म्हणजे अतिशय कमी पाणी पिणे, मद्यपान आणि शरीराची उष्णता वाढणे या आहेत.
नेमके काय होते?
उष्माघाताची प्रक्रिया नीट समजून घेतली पाहिजे. उन्हाळी लागली की, त्वचेलगतच्या रक्तवाहिन्यांमधून उष्णता बाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये त्वचा लालबुंद होते. त्वचेचा रंग काळपट असेल तर नखे, ओठ, आणि खालची पापणी ओढून पाहिल्यास त्वचेचा नेहमीचा रंग बदलल्याचे समजते. मग ओठ सुजतात, घाम येण्याचे बंद झाल्याने त्वचा कोरडी पडते. तीव्र स्वरूपाचा उष्माघात असल्यास व्यक्ती गोंधळल्यासारखी होते, कधीकधी संतापते, मद्यपान केल्यासारखी स्थितीही होते. रुग्णाची नाडी जलद लागते, श्वसनाचा वेग वाढतो. रक्तदाब कमी झाल्याने हृदय अधिक वेगाने आकुंचन पावून शरीरास पुरेसा ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न करते. रक्तदाब कमी झाल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्वचा फिकट होते.
प्राथमिक उपचार हवेतच!
- प्रखर तापमानात बाहेर उन्हात फिरल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण अचानक कमी होते. हे घातक आहे. त्यामुळे उन्हात जाताना कानाला फडके बांधायला हवे. उपाशी पोटी जास्त काळ तीव्र उन्हात फिरणे टाळावे. कारण यामुळे शरीरातील साखरेचा, ग्लुकोजचा पुरवठा कमी होतो.
- या दिवसांत अति थंड पाणी प्यायचे टाळायचे. एसीमधून बाहेर पडून थेट उष्णतेच्या जागी जाणे टाळाच. यामुळे शरीराच्या तापमानात बदल होतो.
- उष्माघात होऊ नये यासाठी मान आणि डोके झाकेल असा मोठा पांढरा रुमाल किंवा पंचा, पूर्ण अंगभर शक्यतो सुती कपडे वापरावेत.
- आपल्याजवळ नेहमी पाण्याची बाटली ठेवावी. किंवा दर अर्ध्या तासाने एक ग्लास पाणी प्यावे, अधून-मधून बर्फ न टाकलेले लिंबू पाणी थोडेसे प्यावे.
डॉक्टरांचा सल्ला घ्या…
उष्माघात हादेखील एक आजार आहे हे लक्षात घेऊन तत्काळ डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. पण तोपर्यंतचा उपचार करणेही सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे आहे. रुग्णाच्या शरीरातील जादा उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व त्याचे रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच पहिला उपचार आहे. त्यासाठी रुग्णास तातडीने सावलीत न्यायला हवे. त्याच्या अंगावर ओली चादर अंगावर टाकून त्याला वारा घातला पाहिजे. शक्य असल्यास रुग्णाला थोडा वेळ थंडगार पाण्यात ठेवावे. रुग्णाच्या शरीराचे तापमान थोडे कमी झाल्यावर त्याला बाहेर काढावे. त्याचे हातपाय चोळावेत म्हणजे रक्ताभिसरण सुधारते. प्रथमोपचारानंतर मात्र रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेऊन औषधोपचार सुरू करणे गरजेचे आहे.
लेखक जनरल जनरल फिजिशियन आहेत.





























































